आदरणीय बाळासाहेब आपटे - व्यक्तिविशेष

राजगुरूनगरचे भुषण आमचे प्रेरणा स्थान

बाळासाहेबांच्या जीवनाची वैषिष्टये दुर्मिळ असा संयोजक, नेटका समन्वक, कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण करणारा कार्यकर्ता, धेयधूंद कार्यकर्ता, निष्ठावंत प्रचारक, कुशल संघटक, पट्टीचा वक्ता, एक लोकप्रिय खासदार, आदर्श लोकप्रतिनीधी, झुंजार संसद पटू, अभ्यासू प्रतिनिधी, अजात शत्रू लोकसेवक, लोकोत्तर जीवन व्रती, लोकाभिमुख असा विकासभिमुख असा राजगुरूनगरचा एक महान देशव्यापी कार्यकर्ता.

प्रा.बाळ आपटे एक संयमी आणि विद्वान खासदार म्हणून प्रसिध्द होते. विचारवंत म्हणून ओळख असलेल्या प्रा.आपटे यांनी राज्यसभेत अनेक महत्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. नामांकित विधीज्ञ म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून विद्यार्थ्यांचे संघटन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. मुंबई विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही लक्षणीय होती. बाळ आपटे यांचे वर्णन करायचे झाले तर समाजसुधारक, जागरूक वकील आणि राजकारणात राहूनही अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असे करावे लागेल. न्यायव्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर आहे. या व्यवस्थेत दोष राहू नये यासाठी ते आग्रही असत.

सत्ता, स्वार्थ आणि स्वकेंद्रित अशा भावना त्यांच्या मनाला कधी स्पर्शही करत नव्हत्या. राष्ट्र प्रभावशाली झाले पाहिजे आणि ते कार्य संस्कारित कार्यकर्ते आणि नेतेच करू शकतात. त्यामुळे अशी पिढी घडवण्याचे त्यांनी मान्य केले. स्षष्टवक्तेपणा हा त्यांच्यातील आणखी एक गुण होता. पक्षाच्या बैठकीत भीडभाड न ठेवता ते बोलायचे आणि अयोग्य विचारांवर आपले स्पष्ट विचार ते मांडायचे. राजकारणात येऊनही एखादे पद वा प्रतिष्ठेसाठी त्यांनी कधीच आग्रह धरला नाही. राजकीय सत्तास्पधेृत अनेक माणसे मोठी स्वप्ने नेहमी पहात असतात. परंतु सार्‍यांचीच स्वप्ने कधी पूर्ण होत नाहीत. मग आपटे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वाने व नेतृत्वाने भारतीय राजकारणात स्वतःची नाव सुवर्ण अक्षरांत लिहीले हे देश कदापि विसरू शकत नाही. अभाविपच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना जवळपास ३० वर्षे संघटीत करून राष्ट्रभक्ती व देशप्रेम यांचे व्रत देणारे आपटे साहेबांचे व्यक्तीमत्त्व खरे तर देशातील युवकांचे प्रेरणास्थानच होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करताना अत्यंत अभ्यासपूर्वक व स्वतः कायद्याचे उत्तम अभ्यासक असल्याचे पक्षाला योग्य दिशेने नेण्याचे कार्य पक्ष कधीही विसरू शकत नाही. राज्यसभेचे खासदार असतानाही पदाचा व्यर्थ अभिमान न बाळगता अत्यंत शांत सयंमी व अभ्यासू वृत्तीने या पदाचा मान राखत मातृभूमी राजगुरुनगरमध्येही खासदार निधीतून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. हे राजगुरुनगरमधील जनता स्मरणात ठेवील. हुतात्मा राजगुरु जन्मभूमी स्मारक बांधकाम व जन्मशताब्दी राष्ट्रीय कार्यक्रम होणे कामी आपटे साहेबांनी केंद्र स्तरावरून शक्य ती मदत सातत्याने करण्याचा प्रयत्न केला. देशभर जन्मशताब्दीस जाहीराती आल्या, हुतात्मा राजगुरु यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध व्हावे यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयात त्यांनी जो पाठपुरावा, पत्रव्यवहार केला तो निश्‍चित स्मरणात राहतो. आपल्या पदाचा, कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता सतत कार्यमग्न राहणारे आपटे साहेबांचे व्यक्तीमत्त्व देशातील स्वयंसेवक व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देत राहील, यात शंका नाही. तेव्हा आपटे साहेबांचे शांत, संयमी व्यक्तीमत्त्व मला भावले, ते देहरुपाने जरी अनंतात विलीन झाले, तरी या मातीतल्या येणार्‍या नव्या पिढीसाठी कर्तुत्वाचा दिपस्तंभ असतील.

दिनांक १३/०२/२०११ रोजी राजगुरूनगर सहकारी बँकेने पुणे-नाशिक हायवे रोडवर नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन बॅकेचे संचालक सभासद आणि अनेक गावातील अपाटे कुटुंबीयांच्या आग्रहानुसार या नुतन वास्तुचे उद्घाटन बॅक संस्थापक सुपुत्र डॉ. शांताराम आपटे आणि बाळासाहेब या दोन बंधूच्या हस्ते करण्याचे ठरविले. जानेवाारी २०११ मध्ये बाळासाहेबांना थोडा फुफ्फुसाचा त्रास आणि थकवा जाणू लागला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारही घेतले. बँकेच्या नुतन वास्तुच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी बँकेचे अध्यक्षव संचालक मंडळ त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले असतां बाळासाहेबांना विशेष आनंद झाला आणि आपली प्रकृती ठिक नाही, परंतू गावकर्‍यांच्या प्रेमाखातर मी आणि माझे कुटूंबीय आम्ही सर्व जण ह्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहू असे बाळासाहेबांनी आनंदाने सांगितले. मात्र हा कार्यक्रम बाळासाहेब आणि राजगुरूनगर ह्यांच्यासाठी राजगुरूनगर मध्ये शेवटचा ठरला. बँक वा गावातील कोणत्याही प्रमुख कार्यक्रमाला बाळासाहेब आणि कुटूंबीय अतिशय उत्साहाने आणि आनंदाने मुंबई वरून गावामध्ये येत असत. गावातील सर्व मंडळीशी बाळासाहेबांचा सहवास हा अतिशय प्रेमाचा आणि आपुलकीचा होता.

राजगुरूनगरला कोणत्याही कार्यक्रमाला आल्यावर बाळसाहेब नेहमीच गावातील सातकर, थिगळे, सांडभोर, आहेर, कासवा, वाळुंज, घुमटकर, खेडकार, पाचारणे, भागवत, कुंभार, चव्हाण, बकरे, वाफगावकर, बोर्‍हाडे, दिक्षीत, दाते, लोहकरे, जोशी, डोळस, शिंदेकर, गुजराथी, कहाणे, मधवे शिंदे, खांगटे, देशमुख, राक्षे, कौदरे, क्षोत्रीय, मोमीन, शेख, शेळके अशा सर्वच मंडळीची अगत्याने आणि आदराने विचारपूस करत असत. सन २००७ साली बाळासाहेबांना जाणता राजा ह्या नाटकाचे आमंत्रण देण्यासाठी गावातील कार्यकर्ते त्यांच्या मुंबईतील गिरीष ह्या निवासस्थानी गेले असता. बाळसाहेबांनी आणि त्यांच्या पत्नी निर्मला काकूंनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली आणि मनभरून आदरातिथ्य केले. ही आठवण कोणीच विसरू शकत नाही. गावातील श्री सिध्देश्वर, केदारेश्वर, विष्णू मंदीर, राम मंदीर, हा त्यांच्या श्रध्देचा विषय होता. बाळासाहेब आपल्यातून इतक्या लवकर देवाघरी जातील असे कोणालाच वाटले नव्हते किंवा ते आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. दिनांक १७ जुलै २०१२ रोजी दूरदर्शनवर दुपारी ३ वाजता बाळासाहेब निधन झाल्याची अप्रिय बातमी अचानक आली. तेव्हा मात्र राजगुरूनगर ते दिल्ली पर्यंत सर्वांनाच धक्का बसला. नको असणार्‍या गोष्टीला सर्वांनाच सामोरे जाण्याची वेळ आली. बाळासाहेबांच्या अंत्य विधीला राजगुरूनगर पासून ते देशपातळीपर्यंत अनेक त्यांचे चाहते शोकाकुल वातावरणात उपस्थित होते. त्यांच्या कुटूंबियापासून त्यांच्या चाहत्यापर्यंत सर्वांनाच शोक अनावर झाला. दिनांक १८ जुलै २०१२ रोजी त्यांच्या माहिम येथील गिरीष ह्या निवास स्थानकापासून त्यांची अंत्ययात्रा दादरच्या स्मशानभुमीकडे निघाली. त्यावेळी अनेक चाहत्यांना अश्रु अनावर झाले. मनोहर जोशी सरांना त्यावेळी राजगुरूनगर वासियांनी सन १९९५ साली झालेल्या कार्यक्रमाची आठवण झाल्यावर सर्वांनाच अश्रु अनावर झाले. त्यांच्या पन्नास वर्षाच्या सहवासातील अनेक सहकारी मित्र देशपातळीवरून आले होते. त्यामध्ये संघाचे प्रचार प्रमुख मदनजीदेवी, लालकृष्ण आडवाणी, नितीन गडकरी, भैयाजी जोशी, रागनाथसिंग, अरूण जेटली, राम नाईक, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंढे, शहनवाज हुसेन, रविशंकर प्रसाद, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, स्मृती इराणी, सुशील कुमार मोदी, प्रकाशजी वडेकर अशी अनेक जिवलग मंडळी आपल्या आदर्श अशा बाळसाहेबांनाशेवटचा निरोप देण्यासाठी शोकाकूल वातावरणात उपस्थित होती. बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या राजगुरूनगर जन्मगावी कळताच गावावर शोककळा पसरली. अंत्य विधीच्या दिवशी गावामध्ये शोकापूर्ण वातावरणात बंद पाळण्यात आला. गावांतील ग्रामपंचायत, शाळा, राजगुरूनगर बँक आणि अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणारी सर्वच मंडळी शोकाकुल वातावरणांत मुंबई येथे आपल्या बाळासाहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती.

दिनांक २२ जुलाई २०१२ रोजी बाळासाहेबांचा अस्थीकलश त्यांच्या राजगुरूनगर ह्या जन्मगांवी विसर्जन करण्यात आला. त्यावेळी गावातील अनेकांनी त्यांच्या स्मृतींना शोकसभेमध्ये उजाळा दिला. त्यामध्ये राजगुरूनगर ग्रामपंचायत, राजगुरूनगर बँक, शाळा, कॉलेज, वकिल, विद्यार्थी परिषद, व्यापारी महासंघ, सहकारी संस्था, पत्रकार बंधू अशा अनेकांनी बाळासाहेबांना शोकाकूळ वातावरणांत श्रध्दांजली वाहिली आणि बाळासाहेबांना गावात शोकाकूल आणि भावपुर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

आपल्या स्वकर्तुत्वावर गल्ली ते दिल्ली पर्यंत निस्पृह अशा वृत्तीने यशस्वी झालेल्या दादासाहेब आणि बाळासाहेब अशा पिता, पुत्रा विषयी एकच म्हणावस वाटत की,

“दादासाहेब आपटे ह्यांनी त्याकाळात गावात लावले समाज कार्याचे इवलेसे रोपटे
त्या समाज कार्याचा वटवृक्ष वाढविला बाळासाहेबांनी देशव्यापी
प्रत्येक समाज कार्यात दादासाहेबांनी त्या काळात गावात केला अमृताचा स्पर्श
त्याच योगी बाळासाहेबांनी उभा केला हा समाज सेवेचा देशव्यापी राजगुरूनगरचा एक महान आदर्श.”