बाळासाहेब आपटे - वकिली व्यवसाय

१९६४ मध्ये बाळासाहेबांनी एल.एल.एम. ही कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व मुंबई न्यायालयात वकिली करण्याकडे अधिक लक्ष्य वळविले. ज्येष्ठ वकील अॅड. का. ज. अभयंकर यांचे बरोबर कनिष्ठ सहकारी – त्यांचे ज्युनिअर – म्हणून त्यांनी १०-११ वर्षे काम केले. अॅड. अभ्यंकरांची कार्यालयीन शिस्त , अशिलांची पिळवणूक न करण्याचे तत्व बाळासाहेबांना त्यांच्या स्वभावानुसार फार भावले. तीव्र बुद्धिमत्ता, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, अशीलाच्या तक्रारीच्या गाभ्याचे विश्लेषण प्रभावीपणे न्यायाममूर्तींसमोर मांडण्याची हातोटीयामुळे अभ्यंकर साहेबांचा विश्वास त्यांना लाभला. कार्यक्षम व नैतीक वकिली, तर्कशुद्ध व न्याय्य भूमिकेचा ठाम निर्वाह यामुळे न्यायमूर्तींना त्यांची भूमिका मान्य करावी लागे.

बाळासाहेबांच्या कार्यालयात सर्व कागदपत्रे ठेवण्याची विशिष्ट पद्धत होती. त्यामुळे कागदपत्रे सापडत नाहीत, त्यांची नोंदच नाही असे कधीच घडत नसे. अशिलाला त्यांच्या कामाच्या स्थितीबद्दल वेळोवेळी पत्राने सूचना जात व अशीलाच्या प्रत्येक पत्राला उत्तर रवाना होई. व्यवसायातील आय-व्ययाची व्यवस्थित नोंद असे. कारकून व शिपाईसुद्धा ही शिस्त कसोशीने पाळत.

आणीबाणीमध्ये रा.स्व.संघाचे शेकडो स्वयंसेवक मिसाखाली डांबले गेले होते. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. त्यांच्या हक्कासाठी बाळासाहेबांनी कोर्टात लढा दिला. स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा आली. त्यांची दुर्दम्य ध्येय्यनिष्ठा व वैचारिक दृढता यांमुळे अशा प्रकरणात अनेकांना न्याय मिळाला.

बुद्धिमत्ता, उद्यमशीलता आणि सचोटी यांची कसोशीने जोपासना करून त्यांनी वकिली केली. व इतरांमध्ये त्याचा आग्रह धरला. त्यामुळे उच्च न्यायालयातील जेष्ठ कनिष्ठ वर्गाबरोबरच न्यायमूर्तींच्या मनात त्यांच्या बद्दल अत्यंत आदराची व विश्वासाची भावना होती. ते कायद्याच्या सर्वच विषयात पारंगत होते. पण अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॅा, कॅान्स्टिट्युशन हे त्यांचे अधिक आवडीचे व हात्खान्द्याचे विषय होते. कायद्याच्या मुलातत्वांबाबत त्यांचा आग्रह असे. व त्या आधारावरच प्रकरणाचा निकाल न्यायमूर्तीनी लावावा असे ते त्यांना पटवत असत. त्यांच्या ह्या कार्यशैलीमुळे वेगळ्या विचारधारेच्या वकिलांनासुद्धा त्यांचा आधार वाटे.

त्यांनी अतिरिक्त महाअधिवक्ता हे पद १९९६-९८ या काळात भूषविले. अेरवी सरकारविरोधी प्रकरणांमध्ये वकील असण्याऱ्या बाळासाहेबांना सरकारी वकिली या काळात करावी लागली. पण नेहमीच केवळ योग्य न्यायाचाच ते पाठपुरावा करीत असल्यामुळे त्यात काही दुविधा आली नाही. १९९० मध्ये ते अॅडव्होकेट्स असोशिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या कोर्टातील वकिलांच्या संघटनेचे अध्यक्ष निवडले गेले. त्याचवेळी मुंबई हायकोर्टाच्या चार न्यायाधीशांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे आले. बाळासाहेबांनी उच्च न्यायालयाच्या सर्व शाखांतील वकिलांचा आदर आपल्या निरपेक्ष व्यवहाराने संपादन केला होता. त्यामुळेच या भ्रष्टाचारी न्यायममूर्तींच्या विरोधी ठराव बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली असोशिएशनने मंजूर केला व त्या न्यायमूर्तींवर कारवाई केली गेली.

त्यांनी केवळ आपल्याबरोबर काम करणाऱ्या जुनिअर वाकीलांचीच काळजी केली नाही तर इतर कनिष्ठ वकिलांबद्दलही तितकीच आस्था त्याना असे. भारताचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. अेस.अेस. कपाडिया यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या या गुणाचे विशेष कौतुक केले आहे.